Marathi kavita - मराठी कविता - Top 10 Marathi kavita

मराठी कविता Welcome friends!

The brand new collection of Marathi kavita is here for you. I am writing here 10+ Marathi kavita from various talented poets (कवी). We hope you all like those Marathi kavita.


Marathi Kavita 1


स्फुट

एक इच्छा बाकीच राहिली तुझी..
मी दाढी करीत असताना मागून बिलगायची.....
मी ही वाट पाहायचो, तू समीप येण्याची...
मलाही, शेविंग क्रीमचा फेस, तुझ्या गालावर लावायचा असायचाच..
पण फार जवळ आली नाहीस
अन् बिलगलीही नाहीस कधीच.
कारण विचारलं तर, माझ्यामुळे तुला ब्लेड लागेल म्हणालीस...
तेव्हा कदाचित तुलाही ठाऊक नव्हतं..
ब्लेडशिवायही होतात जखमा
आणि मलाही नव्हतंच माहीत..
की...
सारेच फेस निसरडे असतात..
                                 -प्रमोद
Marathi Kavita 2तुझ्या इतक्या जवळ आलो, पुढे गंधाळला चाफा
मला आठव कधी केसांमधे जर माळला चाफा

यमूनेच्या तिरावरती कुणी नाराज बसलेले
अचानक वाजला वेणू तसा ओशाळला चाफा

नदीवरती, नभावरती, हरीच्या बासरीवरती
खरोखर सांग ना राधे कुणावर भाळला चाफा

तिने इतकेच केले तोडले हे फूल हातांनी
पुढे कित्येक वेळा तोच मी हाताळला चाफा

तुझाही गंध चाफ्याच्याच गंधा सारखा होता
मिठीच्या आड दोघांनी किती चुरगाळला चाफा

तुला जमले कसे जाणे तुझ्या सोडून चाफ्याला
जशी गेलीस तू मी ही पुढे फेटाळला चाफा

घरा-दारा पुढे होते तिच्याही झाड चाफ्याचे
मला समजून चाफा 'हो' तिने कवटाळला चाफा
                                             -शशिकांत कोळी(शशी)

Marathi Kavita 3तसाही तू तिच्या सोबत कुठे आहे.
व्यथेची एवढी ऐपत कुठे आहे.!

दिवसभर मौन विळखा घालते आहे
बिचारी रात्रही बोलत कुठे आहे.!

कसा मी थांबवू  विस्तार दुःखाचा
सुखाला तेवढी 'बरकत' कुठे आहे.!

मनाची धाव इतकी वाढली आहे
पुढे त्याच्या कुणी धावत कुठे आहे.!

जशी मी सोडली संगत तुझी वेड्या
तुझ्या चेहऱ्यावरी रंगत कुठे आहे.!

हवा होता मला तर कोपरा थोडा
तुझ्या जागेस बळकावत कुठे आहे.!

तुम्ही मोजाल माझे पाप यानंतर
तसेही पुण्य मी मोजत कुठे आहे.!

जणू परक्या ग्रहाची मी रहीवासी
इथे कोणीच माझ्यागत कुठे आहे.!
                                           ममता...
Marathi Kavita 4आपण नाही,हवा जगावी म्हणून झटण्यासाठी
जन्म मिळाला आहे येथे तो घुसमटण्यासाठी

काळ द्यायला तयार होता पंख नभाचे त्यांना
पण लोकांनी आंदोलन केले सरपटण्यासाठी

काय तमाशा करायचा ते आधी ठरले आहे
वेळ लागतो आहे आता केवळ नटण्यासाठी

हाल एवढे करतो आहे जो तो तिचे, जणू की
तिने नवस केलेला होता या फरपटण्यासाठी

तुझ्या दिशेची दिशा उद्या सैरभैर होऊ शकते
मी तर तयार आहे कोठेही भरकटण्यासाठी

तुझ्या मनाचा डाग मला जो दिसला तो दाखवला
तुला कुठे मी सांगत आहे माझे पटण्यासाठी !

दिवे राहिले शाबुत याचा अर्थ हाच तर आहे
वारा आला होता रांगोळी विस्कटण्यासाठी

रक्त आपले शिंपित होती पुढे जायला दुनिया
घाम गाळते आहे आता मागे हटण्यासाठी

हल्ली त्याच्या अवकाशाच्या फार वाढल्या फेऱ्या
नवीन जागा शोधत आहे तो बुरसटण्यासाठी

किंकाळी,आरोळी,डरकाळी,ललकारी,टाहो
मात्र जन्मभर व्याकुळ होता तो पुटपुटण्यासाठी

झगमग पाहुन पूजेची देवांची नीयत फिरली
करती आता लीला मखरातच गुरफटण्यासाठी
                                                      ~ सा ने क र

Marathi Kavita 5मीच हे ब्रह्मांड होतो मीच होतो पोकळी ,
पण जगाने गोष्टही समजावलेली वेगळी !..

थांबलेला काळ सुद्धा सरकतो माझ्यामुळे ,
सर्व घडणाऱ्या क्षणांची मीच आहे साखळी !..

तू गुलाबासारखे सांभाळले होते मला ,
मी गुलाबाची तुला देऊ न शकलो पाकळी !..

मी प्रथेला कोणत्याही मानले नाही इथे ,
हट्ट जर असला तुझा तर बांधतो मुंडावळी !....

मान खाली घालुनी नाकापुढे चालायचे  ,
या स्वभावाने पुढे होणार दुनिया आंधळी !..

पाय डोक्यावर बळीच्या वामनाने ठेवला ,
अंधश्रद्धेनेच पाताळामधे गेला बळी !..

ती 'कळी' इतकी निरागस वाटते हसल्यावरी ,
लाजल्यानंतर तिच्या गालावरी पडते खळी !..

त्या फुलाला आजवर केलाच नाही स्पर्श मी ,
त्या फुलाची पाकळी अद्याप आहे कोवळी !..

एक वीणा आजही मांडीवरी आहे  तिच्या ,
एक मूर्ती आजही हातात आहे सावळी !..
                                               जयेश..Marathi Kavita 6जायचे आहेच तर सांगून जा
एकदा मागे तरी पाहून जा..

सर्वकाही सोबतीला ने तुझ्या
फक्त मागे आठवण सोडून जा

श्वास जेव्हा धडपडाया लागला
काळ वदला ..बस अता थांबून जा

एक श्वापद श्वापदाशी बोलले
भेटला माणूस तर लांबून जा..

एक मन म्हणते..मला हो शाहणा
एक म्हणते..बावळा होऊन जा..

ईश्वरा तू एक इच्छा पूर्ण कर
एक मुलगी या घरी देऊन जा

प्राण ने .. पण,शेवटी इतकेच कर
विठ्ठला मज एकदा भेटून जा..
                                 - गिरीश शाम जोशीMarathi Kavita 7ही कशाची चालली वणवण इथे
नेमके आलोय का आपण इथे ?

हेच कळले कोण नसते आपले
आपले म्हणतात सारे 'जण' इथे

वाकडे पडलेच जर पाउल तुझे
मी पुन्हा ठरणार का 'कारण' इथे

पिंजरा सोडून जो गेला पुढे
तो कुठे जगतोय पक्षी'पण' इथे

'जन्मही' अन 'देह' ही झाला तुझा
हो तुझा झालोय मी कण-'कण' इथे
                                   -शशिकांत कोळी(शशी)

Marathi Kavita 8|| मुख्यमंत्री ||

येतात मुख्यमंत्री, जातात मुख्यमंत्री;
मिळतात सर्व अंती मसणात मुख्यमंत्री.

पाहू चला 'मराठी अवतार' मोगलांचे;
हल्ली म्हणे टग्यांना म्हणतात मुख्यमंत्री.

गर्दी नको, खिसेही आपापले तपासा;
गेले इथून केव्हा इतक्यात मुख्यमंत्री?

जेव्हा 'समान संधी ' त्यांना मिळेल तेव्हा;
होतील सात एका हप्त्यात मुख्यमंत्री.

नाही मनास शांती, नाही कुठे विसावा;
जगल्याविनाच आता जगतात मुख्यमंत्री.

सांगू नये कुणीही कोणास 'पथ्यपाणी';
जे काय खायचे ते खातात मुख्यमंत्री.

हा 'प्लेग'ही नवा अन् लस टोचणेच आले;
करतात वायद्याची बरसात मुख्यमंत्री.

जे आमदार त्यांना समजू नका 'शिपाई';
रांगेमधील तेही 'अज्ञात' मुख्यमंत्री.

दिसतात मातलेले 'साहेब' गावगन्ना;
जो भेटतो तयाच्या अंगात मुख्यमंत्री.

कोणी बरे फुल्यांना केले अजून मोठे?
'जयभीम'ही अताशा करतात मुख्यमंत्री.

कोणास काय ठावे? 'वंशी'च  त्या कळावे;
होऊ नकोस बाबा जन्मात मुख्यमंत्री...!
                                            - सुरेश भट
           

Marathi Kavita 9मी गेल्यावर
तुला वाटेल की आपल्या बाबांनी
वाचलियेत ही सारी पुस्तंकं
पण नाही
अर्धंही वाचता आलेलं नाहीय्
येणारही नाही हे ठाउक होतं मला तरी
मी ज़मवत गेलो होतो ही पुस्तंकं
माझ्यासाठी माझ्या बापाने
काहीच सोडलं नव्हतं मागे
ही अक्षर अोळख सोडून फक्तं
जिच्या मागे धावत मी
पोहोचलो आहे इथवर

तुला सांगण्या समज़ावण्यासाठी की
मलाही सोडता येणार नाहीय् मागे
काहीच स्थावर जंगम तुझ्यासाठी
ही काही पुस्तंकं आहेत फक्तं
जी तुला दाखवतिल वाट
चालवतिल तुला थांबवतिल
कधी पळवतिल कधी
निस्तब्धं करतिल
बोल्तं करतिल कधी
टाकतिल संभ्रमात
सोडवतिल गुंते
वाढवतिल पायाखालचा चिखल
कधी बुडवतिल तरवतिल कधी
वाहावतील कधी थोपवतील प्रवाह
अडवतिल तुडवतिल सडवतील
बडवतील हरवतिल सापडतिल
तुझ्याशी काहीही करतील
ही पुस्तंकं
तू समोर आल्यावर नेहेमीच कवेत घेउन मी माझ्यातली धडधड
तुला देण्याचा प्रयत्नं करतो
तशीच ही पुस्तंकं
उघडतील मधोमध पसरतिल हात
मिठीत घेतील तुला
आपोआप होतिल हृदयाचे ठोके
यांच्यात रहस्य् आहेत दडलेली
अनेक उत्तरंही असतील
प्रश्नांमधे कदाचित कुठेच
प्रश्नही नसतील
एक लक्षात ठेव
आपलं आयुष्यच पल्प फिक्शन कधी क्लासिक
सेल्फ हेल्प फिलॉसॉफिकल कधी कवितिक
कधी किचकट कधी सोपं असतं
लक्षात असु दे या सगळ्यात
वाईट काहिच नसतं
त्या वेळी हाती लागलेलं पुस्तक
त्याच वेळची गरज़ असतं समज़ नसतं
मी नसेन तेंव्हा ही पुस्तकं असतील
जी नेतील तुला ज़ायचं आहे तिथं
फक्तं
मी असेन
तिथं मात्रं तुला पोहोचता येणार नाही
कारण मी आधीच
होउन गेलेलो असेन तुझ्यासाठी
एखादी कथा एखादी कादंबरी
एखादी कविता एखाद्या पुस्तंकातली
माझी आठवण आली की
या प्रचंड ढिगार्यातलं
ते एखादं पु्स्तक शोध
तुझा प्रवास बघ कसा
सोपा होउन ज़ाईल.
                  – सौमित्रMarathi Kavita 10एक कोपरा मला मनाचा सुंदर द्या
अन्यथा मला स्वतःपासुनी अंतर द्या

जमले जर आता नाही तर नंतर द्या
विचारलेल्या प्रश्नाचे पण उत्तर द्या

शोध फुलांचा घेण्यासाठी वेळ कुठे
दुकानातले तुमच्या, तयार अत्तर द्या

भरते कोठे पोट उपाशी स्वप्नाने?
स्वप्न दाखवू नका जराशी भाकर द्या

भेट दिलेली हवी तशी मी जपेन पण
तिला ठेवण्यासाठी एखादे घर द्या

गोड आठवण दिलीत तर मी घेइनही
किंवा हातावरती नुसती साखर द्या
                              - विशाल ब्रह्मानंद राजगुरु

Marathi Kavita 11


जा नका आता विचारू ती कशी आहे
एक राधा आजही वेडीपिशी आहे.!

कोणत्या मातीत मिळते खाण सोन्याची.?
कोणती माती इथे बावनकशी आहे.?

काय मी माझ्या यशाची कौतुके सांगू
जे तुझ्यावाचून येथे अपयशी आहे.!

तू नको सांगूस आता अर्थ प्रेमाचा
हो मला ठाऊक आहे खुदखुशी आहे.!

तोच वारसदार या अनमोल दु:खाचा..
कागदावर जो कुणी बेवारशी आहे.!

जीव देण्याची कशाला एवढी घाई
जीव घेणारा तसाही आळशी आहे.!

हे असावे ठोस कारण आज गर्दीचे
या ठिकाणी एक व्यक्ती छानशी आहे.!
                                              - ममता...

Post a Comment

0 Comments